नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
कोरोना महामारीनंतर आता बर्ड फ्लूचं संकट घोंगावत आहे. बर्ड फ्लू एच5एन1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो. या फ्लूमुळे निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की, व्हायरसच्या संसर्गाची पातळी तीव्र होऊ शकते ज्यामुळे जागतिक महामारीचा जन्म होऊ शकतो.
पिट्सबर्गमधील प्रमुख बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचीपुडी यांनी इशारा दिला आहे की एच5एन1 मध्ये साथीचा रोग निर्माण होण्याची क्षमता आहे. याचे कारण म्हणजे या संसर्गामधे मानवांना तसेच अनेक सस्तन प्राण्यांना देखील संक्रमित करण्याची क्षमता आहे. जॉन फुल्टन, फार्मास्युटिकल उद्योग सल्लागार आणि कॅनडा-आधारित फार्मास्युटिकल कंपनी बायोनियाग्राचे संस्थापक, यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एच5एन1 ने महामारीचे रूप धारण केले तर ते खूप गंभीर असेल असेही त्यांनी म्हटले आहे. एच5एन1 हा कोरोनापेक्षा जास्त घातक आहे. फुल्टन यांनी सांगितले की, हे कोविडपेक्षा 100 पट वाईट आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, 2003 पासून एच5एन1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 887 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी एकूण 462 मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी, कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. साथीच्या रोगाच्या सुरूवातीस ते सुमारे 20 टक्के होते.
बर्ड फ्लू हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा एच5एन1 हा स्ट्रेन कॉमन आहे. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे. तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये एच5एन8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये एच5एन1 हा विषाणू सापडला आहे.