नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच कबुली दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. कोरोना काळात कोविड लस घेतल्यानंतर कोविन अॅपवरून नागरीकांना सर्टिफिकेट दिले जायचे. या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. मात्र आता या सर्टिफिकेटवरुन मोदींचे फोटो हटवण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त होतं आहे.
देशात मोठ्या प्रमाणात झालेल्या लोकांच्या लसीकरणाचं श्रेय पीएम नरेंद्र मोदी यांना दिलं जातं होतं. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने सोशल मीडियावरही विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
अनेक भारतीय लोकांनी आपलं कोरोना सर्टिफिकेट तपासलं असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटा दिसला नाही. याठिकाणी क्यूआर कोड दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा फोटो हटवला असल्याचं स्पष्ट केलं आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे लसीकरण सर्टिफिकेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका या कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्यालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-19 लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. भारतातील नागरिकांना सुद्धा कोविशिल्ड लस देण्यात आली आहे. त्यामुळे भारतात कोरोना लसीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
(पूर्वीचे ट्विटर) वरील काही वापरकर्त्यांनी कोविडच्या लसीच्या प्रमाणपत्रातील हा लक्षणीय बदल अधोरेखित करत आपलं मत व्यक्त केलं आहे. आम्ही आता फक्त प्रमाणपत्र तपासण्यासाठी डाउनलोड केलं होतं पण मोदींचा फोटो गायब झाला आहे आणि तिथे फक्त क्युआर कोड दिसत आहे अशा कॅप्शनसह अनेकांनी आपल्या प्रमाणपत्रांचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत.
आचारसंहितेमुळे सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून पीएम मोदींचे फोटो काढले आहेत. परंतु काही मंत्रालयांनी अद्याप त्याचे पालन केलेले नाही. कायदा मंत्रालयाच्या वेबसाईटवरून अजूनही कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, त्यांचे कनिष्ठ मंत्री पीपी चौधरी यांची छायाचित्रे आणि पंतप्रधानांच्या मन की बात मासिक रेडिओ पत्त्याची लिंक आहे. तसेच अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वेबसाइटवर मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि त्यांचे कनिष्ठ मंत्री वीरेंद्र कुमार यांचे फोटो दिसत आहेत.