नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मद्य घोटाळा प्रकरणात ते आधीच तिहारच्या तुरुंगात आहे. आता त्यांच्यावर शीख फॉर जस्टीस या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून पैसे घेण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात उपराज्यपालांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीने सिख फॉर जस्टिसकडून 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी घेतल्याची तक्रार उपराज्यपालांकडे आली आहे. एलजीला हे पत्र वर्ल्ड हिंदू फेडरेशन-इंडिया नावाच्या संस्थेने लिहिले आहे. उपायुक्तांना लिहिलेल्या पत्रात कट्टर खलिस्तानी समर्थक देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तानी भावनांना प्रोत्साहन देण्याच्या बदल्यात ही देणगी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आम आदमी पक्षाने हा एक कट असल्याचा आरोप केलाय.
उपराज्यपाल सक्सेना यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनआयएकडून चौकशीची शिफारस केली आहे. तक्रार एका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली आहे आणि बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आल्याने याप्रकरणी चौकशीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सस्केना यांनी ही शिफारस करताना जानेवारी 2014 मध्ये केजरीवाल यांनी इकबाल सिंह यांना लिहलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. या पत्रात आप सरकारने राष्ट्रपतींकडे भुल्लरच्या सुटकेची शिफारस केली होती.
विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय महासचि आशू मोंगिया यांनी केलेल्या तक्रारीत केजरीवाल यांनी 2014मध्ये न्यूयॉर्क येथील गुरुद्वारा येथे खलिस्तानी नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा केली होती. या बैठकीत आपला निधी देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. त्या बदल्यात देवेंदर पाल भुल्लर यांच्या सुटकेचे आश्वासन देण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. हे आरोप करताना मोंगिया यांनी खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या एका व्हिडिओचा हवाला दिला आहे.