नागपूर/दै.मू.वृत्तसेवा
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ची थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत नमूद केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या उद्देशाने झाली. या संस्थेअंतर्गत 59 विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येतात. परदेशी शिक्षण, संशोधन, अत्याचार संदर्भात माहिती संकलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास योजना यांसारख्या योजना बार्टीकडून राबविण्यात येतात. मात्र बार्टीचे काही प्रशिक्षण कार्यक्रम बंद असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून बार्टीसाठी मंजूर झालेल्या 365 कोटींपैकी केवळ 75 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. ‘बार्टी’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.
‘बार्टी’तर्फे ‘आयबीपीएस’चे महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांचे प्रशिक्षण मागील 10 महिन्यांपासून बंद असून सुमारे ९ हजार अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी यापासून वंचित असल्याचा आरोप मानव अधिकार संरक्षण मंचाने केला आहे. तसेच एमपीएससी व पोलीस भरतीकरिता मागील दहा महिन्यांपासून 33 जिल्ह्यांत कोणतेही प्रशिक्षण सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे 20 हजारांच्या जवळपास प्रशिक्षणार्थीना याचा फटका बसत असल्याचाही आरोप आहे.
2023-24 मध्ये ‘बार्टी’साठी 365 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत केवळ 75 कोटींचा निधी बार्टीला देण्यात आल्याची माहिती आहे. 2022-23 मध्ये 288 कोटींपैकी फक्त 91 कोटींचाच खर्च झाला. विविध उपक्रम बंद असल्याने हा निधी अखर्चित असल्याचा आरोप आहे. सामाजिक न्याय मंत्रालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. असे असतानाही त्यांच्याच खात्याला निधीची चणचण भासत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बार्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा घोषणा सरकारकडून माध्यमांमध्ये केल्या जातात, परंतु सरकारने मंजूर केलेल्या निधीपेक्षा मिळत असलेला निधी हा तुटपुंजा असून सरकारने मागासवर्गीय समाजाच्या तोंडाला केवळ पाने पुसली असल्याचा आरोप केला जात आहे.
‘बार्टी’चे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम बंद आहेत. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक न्याय विभाग असताना बार्टीची अशी दुर्दशा होणे खेदजनक आहे, असे मानव अधिकार संरक्षण मंचचे आशीष फुलझेले म्हणाले.
तर सरकारकडून उर्वरित निधी मिळणे सुरू झाले आहे. कुठलाही विपरित परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला नाही. याशिवाय आयबीपीएसचे प्रशिक्षण कार्यक्रम येणाऱ्या आठवडय़ात सुरू होत आहेत. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उर्वरित अन्य प्रशिक्षणही लवकरच सुरू होणार आहेत, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.