नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
दिल्लीत एका पोलीस अधिकार्याने रस्त्यावर एका मशिदीबाहेर नमाज अदा करणाऱ्या जमावाला लाथ मारून हाकलून लावले. या घटनेचा विडियो सोशल मीडियात वायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून या घटनेचा लोकांमधून तीव्र निषेध केला जात आहे. दिल्लीतील इंद्रलोक भागातील ही घटना आहे.
एका रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एका मशिदीबाहेर नमाज अदा करणाऱ्या जमावाला दिल्ली पोलीस उपनिरीक्षकाने लाथ मारून हटवले. यानंतर उत्तर दिल्लीतील इंद्रलोक पोलिस चौकीचे प्रभारी उपनिरीक्षक मनोज कुमार तोमर यास तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये तोमर हे नमाज अदा करणाऱ्या काही पुरुषांना लाथ मारताना आणि ढकलताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये अन्य दोन पोलीस तोमर यांच्या मागे फिरताना दिसतायत जे या जमावाला आपली चटई उचलून तिथून निघून जाण्यासाठी ओरडत आहेत. नमाज पठण सुरू झाल्यानंतर तोमर यांनी या गर्दीतील काहींना लाथ मारत हाकलून लावले.
नमाज अदा करणाऱ्यांपैकी काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नमाजासाठी जमा झालेली ही गर्दी मशिदीपासून बाहेरच्या रस्त्यावर पसरली होती, परंतु वाहतुकीला अडथळा होत नव्हता. घटनेवेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, आम्ही रस्ता अडवत नव्हतो. नमाज पठण करण्यासाठी मशिदीच्या बाजूला फक्त एक अरुंद मार्ग वापरला जात होता आणि वाहतूक दर शुक्रवारी सुरळीत चालू होती. घटना घडली तेव्हा आम्ही आमची चटई पसरून नमाज पठण करण्यासाठी बसलो होतो.
पोलीस कर्मचारी मागून आमच्या जवळ आले आणि आम्हाला जबरदस्ती करून निघून जाण्यास सांगत होते, दर शुक्रवारी आम्ही नमाज अदा करतो तेव्हा जवळच्या पोलिस चौकीतून या ठिकाणी पोलिसांना तैनात केले जाते, पण असे पहिल्यांदाच घडले आहे. दरम्यान, या घटनेनंतर तोमर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पोलिस चौकीबाहेर जमाव गोळा झाला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीसीपी-स्तरीय आणि संयुक्त सीपी-स्तरीय अधिकाऱ्यांसह दंगल-नियंत्रण वाहने आणि निमलष्करी दलांसह परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली होती.
पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी जमावाला सांगितले की, तोमर मागील दोन महिन्यांपासून इंद्रलोक चौकीत तैनात होते. कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नसली तरी पोलीस उपनिरीक्षक तोमर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. त्यांच्या विरोधात यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत का ते तपासले जाईल. सध्या व्हिडिओच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल.