नागपूर/दै.मू.वृत्तसेवा
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविल्याने त्यांचा रामटेक लोकसभा निवडणुकीतील अर्ज रद्द करण्यात आला. याविरुद्ध त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावले. गुरूवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने बर्वे यांना दिलासा मिळाला आहे. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. यामुळे त्याची निवडणूक लढण्याची संधी हुकली आहे.
याचिकेनुसार गेल्या आठवड्यात राज्य सरकारने नव्याने रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र चौकशीचे आदेश जारी केले. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेसुद्धा बर्वे यांना नोटीस बजावली. समितीने त्यांना अवघ्या 24 तासांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. हे नैसर्गिक न्याय नियमांच्या विरुद्ध आहे. इतकेच नाही तर अगदी तातडीने समितीने त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरविले. ही सर्व प्रक्रिया राजकीय सुडापोटी होत असून ती अवैध असल्याचा दावा करणारी याचिका रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यालयाने नकार दिला होता.
दुसरे प्रकरणी नवनीत राणा 2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे 2021 मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही प्रकरणांचे निकाल गुरूवारी लागले.
रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरवला. पण निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्याने व त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिल्याने बर्वे यांना न्यायालयाने दिलेल्या दिलासाचा काहीही उपयोग झाला नाही. राणा यांच्या प्रकरणावरही सुप्रीम कोर्टाने निकाल देताना त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे राणा यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला, त्यांनी अर्जही भरला.
राजकीय अंगाने या दोन्ही प्रकरणाकडे पाहिले तर भाजपचा याच्याशी संबंध येतो. नवनीत राणा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सेना -भाजप युतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून येताच त्यांनी केंद्रात मोदींना समर्थन दिले. 2021 मध्ये जात प्रमाणपत्र रद्द होऊनही त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित राहिले. रश्मी बर्वे भाजपविरोधात लढून जिप.मध्ये निवडून आल्या. रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आले. त्याच्या चौकशीसाठी सरकारी यंत्रणा तत्पर्तेने हलली.