नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान डिप्लोमसी इन फार्मा अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’ आणि भारतीय क्रिकेटपटूंची नावे लिहिली. यानंतर विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण देण्यात आले. या बातमीवरून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, चार मुलांनी परीक्षेत ‘जय श्री राम’ लिहिले अन् परीक्षकांनी त्यांना 50 टक्के गुण दिले.
नावांचा उल्लेख करत ओवेसी म्हणतात, मला त्या चार मुलांची नावे कळली आहेत. यामध्ये पहिले नाव नरेंद्र मोदी, दुसरे नाव अमित शहा, तिसरे नाव योगी आणि चौथे नाव नड्डांचे आहे. त्यांनी काहीही केले नाही, तरीपण त्यांना मत द्या. हे लोक परीक्षेत ’जय श्री राम’ लिहून 50 टक्के गुण मिळवतात. आमची मुलगी हिजाबमध्ये जाते, तर परीक्षेला बसू दिले जात नाही.
उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत जय श्री राम आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिली होती. मात्र, परीक्षकांनी त्यांना 56 टक्के गुणांसह पास केले. या घटनेची मीडियात खुप चर्चा झाली. याचाच उल्लेख करत ओवेसींनी मोदी-शहांवर निशाणा साधला.
गेल्या आठवड्यात राजस्थानमधील बांसवाडा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, ते माता-भगिनींचे सोने आणि मंगळसूत्रही घेऊन टाकतील आणि त्यांची संपत्ती, जे लोक अधिक मुलं जन्माला घालतात त्यांना वाटून टाकतील. या वक्तव्यावरूनही ओवैसींनी पीएम मोदींवर हल्लाबोल केला आहे.
आपण द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम अधिक मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवण्यचा प्रयत्न का करत आहात? मोदी सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. हा माझा डेटा नाही, तर मोदी सरकारचा डेटा आहे. मात्र, नरेंद्र मोदी द्वेष पसरवत आहेत. मुस्लिमांचा जन्मदर सर्वाधिक आहे, असल्याचे सांगत बहुसंख्य समाजाची दिशाभूल करायची त्यांची इच्छा आहे.
मोदी म्हणाले होते, मनमोहन सिंग सरकारने देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले, एका देशाचे पंतप्रधान 15 टक्के लोकांना घुसखोर म्हणत आहेत. हे अत्यंत लज्जास्पद आहे.