मंगळवेढा/दै.मू.वृत्तसेवा
पवित्र पोर्टलद्वारे नविन भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सध्या कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी अशी राज्यातील शिक्षकांची मागणी पूर्ण झाली असून ग्रामविकास विभागाचे उपसचिव पी.डी.देशमुख यांनी दि. 11 मार्च याबाबतीत स्वतंत्र पत्र काढून नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी दि. 21 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार बदल्या कराव्यात असा स्वतंत्र आदेश निर्गत केला. त्यामुळे नजिकच्या काळात बदल्याचा मार्ग सुकर झाल्याने राज्यातील शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश निर्गत केल्याने राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याची मागणी पुर्णत्वास गेली असून नजिकच्या काळात बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दीर्घकाळ पाठपुरावा करीत शिक्षक भरती प्रक्रीयेला चालना दिली होती. मात्र सदरच्या प्रक्रीये दरम्यान शिक्षक बदल्यांचे धोरणाचा शासन स्तरावर फेरविचार सुरु झाल्याने शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, सरचिटणीस राजन कोरगांवकर, कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी मिळावी यासाठी शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने दि. 21/6/2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने बदल्यांसाठी आदेश पारीत केला होता.
मात्र जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांचे अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात .त्यामुळे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य पदाधिकार्यांनी याबाबतीत मंत्रालय स्तरावर ग्रामविकास विभागाकडून स्वतंत्र आदेश निघावा यासाठी पाठपुरावा केला होता. आता ग्रामविकास विभागाचे उपसचिव पी.डी.देशमुख यांनी दि. 11 मार्च याबाबतीत स्वतंत्र पत्र काढून नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी दि. 21 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार बदल्या कराव्यात असा स्वतंत्र आदेश निर्गत केला.