मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या प्रकृतीचे कारण सांगत सतत या खटल्यातील सुनावणील गैरहजर राहत आहेत. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रकृती खरेच बिघडली आहे का, असा प्रश्न विशेष न्यायालयाने बुधवारी उपस्थित केला असून साध्वी यांच्या आरोग्याची शहानिशा करा आणि त्या संबंधित अहवाल ८ एप्रिल रोजी सादर करा, असे आदेश विशेष न्यायालयाने प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले आहे.
विशेष म्हणजे, वैद्यकीय कारणास्तव सतत सुनावणीला अनुपस्थित राहणाऱ्या साध्वी यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल मागवण्यात यावा, अशी मागणी एनआयएने केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन मागणी योग्य वाटत असल्याचे नमूद करून न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. खटल्याच्या सुनावणीला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव साध्वी सतत अनुपस्थित राहतात. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे खटल्याच्या कामकाजावर परिणाम होत असून खटल्याला विलंब होत आहे, अशी टिप्पणीही विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी यांच्या आरोग्याची शहानिशा करण्याचे आदेश देताना केली.
साध्वी या बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित राहिल्या. त्याबाबत न्यायालयाने खडसावले. वास्तविक, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत आरोपी म्हणून साध्वी यांचे आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांबाबत म्हणणे नोंदवून घेण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. परंतु, त्यांची सततची अनुपस्थिती खटल्यात अडथळा निर्मांण करत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात एकूण 6 जणांचा मृत्यू तर जवळपास 100 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण ७ जणांविरोधात खटला चालू आहे. यामध्ये प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात एलएमएल फ्रीडम या दुचाकीचा वापर करण्यात आला असून ती साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.