बुलढाणा/दै.मू.वृत्तसेवा
राज्य सरकारने नुकतीच सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती मार्गाची घोषणा केली होती. या मार्गाचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावर येणाऱ्या जमिनी अत्यंत सुपीक आणि पिकाऊ असल्याने या मार्गाच्या बांधकामामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सिंदखेडराजा ते शेगावला जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असल्याने, सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या भक्ती मार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आता आमदार राजेंद्र शिंगणे यांनी प्रस्तावित ‘भक्ती मार्ग’ रद्द करण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा मार्ग नकोच अशी ठाम भूमिका घेतली आहे.
जिजाऊंचे माहेर घर सिंदखेडराजा ते शेगाव असा हा प्रस्तावित ‘भक्ती मार्ग’ आहे. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातील तब्बल 43 गावांतील सुपीक शेत जमीन यासाठी संपादित करण्यात येणार आहे. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहे. यामुळे या मार्गाला मंजुरी मिळाल्याबरोबर विरोध होऊ लागला आहे. 43 गावांतील अनेक ग्रामपंचायतींनी या विरोधात ठराव घेतले आहे.
यापाठोपाठ आता शिंगणेंनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंगणे यांना लेखी पत्र पाठविले आहे. यात त्यांनी वरील मुद्दे मांडून सुरू असलेले भूसंपादन तातडीने थांबवावे आणि मार्गच रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, हा मार्ग महायुतीच्या प्रचाराचा संभाव्य मुद्दा असणार हे जवळपास निश्चित आहे. यामुळे अजितदादा गटाने विरोध केल्याने युतीची अडचण होणार असल्याचे मानले जात आहे.
सिंदखेडराजा ते शेगाव असा प्रस्तावित भक्ती मार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून मार्गाच्या बांधकामामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भिती व्यक्त करत शेकडो शेतकऱ्यांनी याच महिन्यात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन तात्काळ हा भक्ती मार्ग रद्द करण्याची मागणी केली होती. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला होता.