सोलापूर/दै.मू.वृत्तसेवा
माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीला धक्का बसला आहे. कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला असून पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा निर्धार कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.
संजय कोकाटे यांनी आपल्या सोबत इतर पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच भाजप बबनदादा शिंदे यांच्या समर्थनार्थ काम करा असे भाजप सांगत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामा देत असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
संजय कोकाटे यांनी सांगितले आम्ही राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केलं. त्यांच्या बाजूनं राजकारण करा अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची किंवा भाजपची असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. माझा राजकीय बळी मी कोणासाठी का देऊ? असा सवाल त्यांनी केला
भाजपचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे. माढा, आणि करमाळाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावळीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिला असं नव्हे तर खतपाणीही घातलं जात आहे. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या विरोधात काम केलं. आता आम्हीही या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात काम करणार आहोत, अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.
मराठा, धनगर, ओबीसी या सर्व आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. अशा पक्षाचा आम्ही का म्हणून प्रचार करायचा? असा सवालही संजय कोकाटे यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आगामी काळात युती राहणार आहे. आम्ही मात्र भाजपच्या उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्धार केला असल्याने संभ्रम नको म्हणून पक्षाचे पद आणि पक्ष त्याग करण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.