वाशीम/दै.मू.वृत्तसेवा
एकदा प्रतिनिधी निवडून गेला कि तो पार्च वर्षे आपल्या मतदार संघात फिरूनही पाहत नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्या प्रतिनिधीला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार अकोला मतदारसंघात पाहायला मिळत आहे. अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय धोत्रे मतदार संघात फारसे दिसून न आल्याने त्यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तुमच्या वडिलांनी 10 वर्षात काय केलं, आता आम्ही तुम्हाला मतं का द्यायची? असा सवालच गावातील लोकांनी अनुप धोत्रे यांना केला आहे.
मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी दहा वर्षात काय केले? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे? असा सवाल ग्रामस्थ करत असून तशी चित्राफित सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसारित होत आहे.
अकोला लोकसभेचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र व भाजप लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी रिसोड व मालेगाव तालुक्यात प्रचार मोहीम हाती घेतली आहे. त्यांचे वडील या भागाचे खासदार आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील होते. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघ अकोला लोकसभेत येतो. मात्र, त्यांनी रिसोड व मालेगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी व ठराविक गावांनाचा झुकते माप दिल्याची चर्चा मतदार संघात आहे. मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाही. अमानी येथे औद्योगिक वसाहत नावापुरतीच असून केवळ दोन उद्योग मागील पंचवीस वर्षात उभे राहू शकले. रस्ते आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड व मालेगाव तालुक्यात कायम आहेत. असे असताना आम्ही पुन्हा तुम्हाला का मत द्यायचं, असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे.
यावेळेस भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना रिसोड व मालेगाव तालुक्यातील जनतेची आठवण येत असल्याची खदखद नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अनुप धोत्रे यांचे प्रचार कार्यालय मालेगाव येथे सुरु करण्यात आले असून भाजपचे पदाधिकारी भर उन्हात गावन, गाव पिंजून काढत आहेत. गुरूवारी प्रचारदरम्यान अनुप धोत्रे यांनी मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना स्थानिक नागरिकांनी थेट सवाल करत दहा वर्षांत काय काम केलेत, याचा लेखाजोखा मागितला आहे. खासदार संजय धोत्रे यांची अनुपस्थित व मतदार संघाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचे पुत्र अनुप धोत्रे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.